(चिपळूण)
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशसह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून यानुसार नूतन उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा व प्रदेश सरचिटणीस यांचा सत्कार कार्यक्रम आज (बुधवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी) सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे होणार आहे.
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश सह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी रमेश कीर व हुस्नबानू खलिफे यांची वर्णी लावली आहे तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी घाग तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नुरुद्दीन सय्यद व रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदी सुरेश कातकर यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी महिला प्रतिनिधीची निवड करून महिलांचा सन्मानच केला आहे.
या निवडीवर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश संपादन मिळवून अथक मेहनत घेऊ, असे स्पष्ट केले.
या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण व प्रदेश सरचिटणीस यांचा सत्कार सोहळा आज रत्नागिरी येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा पदग्रहण सोहळा व सत्कार कार्यक्रम काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.