(मुंबई / वृत्तसंस्था)
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदानात वाढ करून ते 5 कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. याशिवाय देश-विदेशात 49 साहित्य संमेलने, 13 विद्यापीठांमध्ये युवा साहित्य संमेलने आणि पुणे पुस्तक महोत्सवासाठी वाढीव आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून देश-विदेशात विविध साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीत संबंधित साहित्यिक संस्था आणि संघटनांशी चर्चा करण्यात आली असून, समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडेय यांच्यासह विविध संस्थांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे.
साहित्य संमेलनाच्या अनुदानात मोठी वाढ
यंदा होणारे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार असून, यापूर्वी दिले जाणारे 3 कोटी रुपयांचे अनुदान वाढवून 5 कोटी रुपये करण्यात आले आहे. मराठी भाषेचा प्रचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता देशभर आणि जगभर करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे पुस्तक महोत्सवाला 50 लाखांची मदत
देशातील प्रमुख पुस्तक महोत्सवांपैकी एक असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवासाठी यंदा 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वी या महोत्सवासाठी 25 लाख रुपये दिले जात होते. यंदा हा महोत्सव साहित्य संमेलनाचा महत्त्वाचा भाग असल्याने अनुदान दुप्पट करण्यात आले आहे.
13 विद्यापीठांमध्ये युवा साहित्य संमेलन
तरुण पिढीमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये युवा विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाला 25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
देश-विदेशात 49 साहित्य संमेलने
मराठी साहित्याचा जागतिक विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात 49 विविध साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये कामगार, वारकरी, संत, महिला, विद्यार्थी आणि उद्योग साहित्य संमेलनांचा समावेश असेल. हे उपक्रम मराठी भाषा विभाग आणि मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जाणार आहेत. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मंजूर करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतूनच या विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल.
‘100वे साहित्य संमेलन महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण’
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जगातील मातृभाषेला समर्पित असलेल्या मोजक्या आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य संमेलनांपैकी एक आहे. मराठी भाषेला जागतिक ओळख मिळावी, यासाठी शासन, साहित्य संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त प्रयत्नातून व्यापक उपक्रम राबवले जाणार आहेत.

