(चिपळूण)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव महाविद्यालयात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणूनच या दिनाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. वेदव्यासांनी वेदांचे संकलन करून मानवजातीस अमूल्य ज्ञान दिले. गुरु हा अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ असतो. त्यामुळेच गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या पूजनाबरोबरच त्यांच्या उपदेशाचे स्मरण आणि पालन करण्याचा दिवस ठरतो.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचा सत्कार करून आपले आदरभाव व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांमध्ये विद्यार्थिनी कु. आर्या दुर्गुळे, कु. नम्रता अहिरे, कु. देवयानी गुरव व प्रेम जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्राध्यापक प्रथमेश घर्वे, प्राध्यापिका सिद्धी नाईक, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे आणि गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शितल डोहळे हिने तर आभारप्रदर्शन कु. गायत्री मांगडे हिने केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, दोन्ही महाविद्यालयांचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.