(चिपळूण)
चिपळूण शहरातील सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जय हिंद क्रीडा मंडळ, गोवळकोट यांच्यावतीने व वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या सहकार्याने श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी भक्तनिवास, गोवळकोट येथे सोमवार दिनांक २८.०४.२०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रसाद चिपळूणकर, सहसेक्रेटरी वसंत भैरवकर, व्यवस्थापक आप्पा रेडीज, पुजारी गोविंद भैरवकर, मनोज खेराडे, मंडळाचे अध्यक्ष संकेत शिंदे, मंडळाचे सर्व सभासद आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाचे डॉ. श्री. रवी अगरवाल व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. रक्तदान करूया, मानव धर्म वाढवूया असा संदेश या रक्तदान शिबिराद्वारे जय हिंद क्रीडा मंडळामार्फत देण्यात आला होता.
मंडळाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ४० रक्तदात्यांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे निटनेटके व उत्तम नियोजन पाहून रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाने देखील मंडळाच्या सभासदांचे कौतुक केले. रक्तदान शिबिर उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जय हिंद क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.