(चिपळूण)
रत्नागिरी जिल्ह्याच्या आंबा पट्ट्यात असलेली चिपळूण तालुक्यातील गोपाळवाडी रावणीचे टेप येथे घडलेली एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चुलत बहिणीनेच ७०० हापूस आंबे चोरून नेल्याचा प्रकार २४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून, चोरी गेलेल्या आंब्यांची किंमत तब्बल १०,५०० रुपये इतकी आहे. याबाबत आता फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी मनोहर तुकाराम साबळे (वय ५६, रा. मार्गताम्हाणे-गोपाळवाडी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. साबळे यांच्या मालकीच्या हापूस आंब्याच्या झाडावरील ७०० हापूस आंब्यांचे गुपचूप चोरण्याचे धाडस चुलत बहिणीने केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे.