(माणगाव)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. इंदापूर येथील डायव्हर्जनजवळ शनिवारी (११ मे) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो आणि छोट्या टेम्पोमध्ये समोरासमोर धडक होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्रसिंग रजपूत (वय ३०) यांनी त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. GJ 18 BV 7151) हे वाहन गोव्याच्या दिशेने मुंबईकडे चालवत असताना इंदापूर येथील डायव्हर्जनकडे दुर्लक्ष करून सरळ गेल्याने समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोला (क्र. MH 47 AS 5889) जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून आठ जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फडताडे करीत आहेत.