( नवी दिल्ली )
भारतात डिजिटल व्यवहारांचा वेग वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या पद्धती अधिक धोकादायक आणि अत्याधुनिक केल्या आहेत. पूर्वी बनावट फोन कॉलद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढणारे सायबर भामटे आता एसएमएस (SMS) स्कॅमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करत आहेत. एका नव्या सायबर सुरक्षा अहवालानुसार, 2025 च्या दुसऱ्या सहामाहीपासून 2026 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत भारतात SMS-आधारित फसवणुकीच्या घटनांमध्ये तब्बल 146 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर एकूण मोबाईल फ्रॉडमध्ये 67 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही आकडेवारी देशातील वाढत्या सायबर धोक्याचे गंभीर चित्र स्पष्ट करते.
सायबर सुरक्षा क्षेत्रातील बायोकॅच (BioCatch) या संस्थेच्या अहवालानुसार, आता केवळ अँड्रॉइड वापरकर्तेच नव्हे तर आयफोन वापरकर्तेही सायबर गुन्हेगारांच्या प्रमुख निशाण्यावर आहेत. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, iOS उपकरणांवरील फसवणुकीच्या घटनांमध्ये 86 टक्क्यांची वाढ, तर अँड्रॉइड उपकरणांवरील फसवणुकीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आयफोन वापरणे म्हणजे पूर्ण सुरक्षितता, हा समज आता चुकीचा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीची पद्धतही बदलली आहे. अहवालानुसार, फसवणूक करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 32 टक्क्यांनी कमी झाला असला तरी एका व्यवहारात लुटली जाणारी रक्कम तब्बल 1.7 पट वाढली आहे. म्हणजेच, काही मिनिटांतच नागरिकांच्या खात्यातून मोठी रक्कम गायब केली जात आहे. दुसरीकडे, वेब ब्राऊझरद्वारे होणाऱ्या फसवणुकीत 10 टक्क्यांची घट झाली असून, सायबर गुन्हेगारांचा संपूर्ण भर आता मोबाईल प्लॅटफॉर्मवर केंद्रित झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.
सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट्स’चेही मोठे जाळे उघडकीस आले आहे. 2025 मध्ये देशातील 700 हून अधिक बँक शाखांमध्ये 8.5 लाखांपेक्षा जास्त म्युल खाती आढळली. संपूर्ण वर्षभरात 26.48 लाख संशयास्पद म्युल खात्यांची प्रकरणे समोर आली, तर सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारींमधील आर्थिक रक्कम 22,496 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, बँका, सायबर सुरक्षा संस्था आणि तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे 9,055 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक वेळेत रोखण्यात यश आले आहे.
सायबर तज्ज्ञ टॉम पीकॉक यांच्या मते, एसएमएस हा अजूनही सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह संवादाचा मार्ग मानला जातो. याच मानसिकतेचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. ते बँका, सरकारी संस्था, कुरिअर कंपन्या किंवा मोबाईल सेवा प्रदात्यांच्या नावाने अगदी खऱ्यासारखे दिसणारे बनावट संदेश पाठवतात. या संदेशांमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा दिलेल्या सूचनांचे पालन केल्यानंतर काही क्षणांतच बँक खाते रिकामे होण्याचा धोका निर्माण होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनच्या मदतीने हे हल्ले आता अधिक वेगाने होत आहेत. नागरिकांना पडताळणी करण्याची संधीही मिळत नाही आणि काही मिनिटांत संपूर्ण फसवणूक पूर्ण केली जाते.
भारतात UPI, मोबाईल बँकिंग, ई-कॉमर्स आणि ऑनलाइन गुंतवणूक यांचा वापर विक्रमी वेगाने वाढत असल्याने सायबर भामट्यांचे लक्ष्यही या सेवांकडे वळले आहे. KYC अपडेट, बँक खाते बंद होणार, पार्सल डिलिव्हरी, रिवॉर्ड पॉइंट्स, वीज बिल किंवा UPI व्हेरिफिकेशनच्या नावाने पाठवले जाणारे बनावट SMS हे सध्या फसवणुकीचे सर्वात मोठे माध्यम ठरत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही अनोळखी संदेशातील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे, OTP, UPI PIN किंवा बँकिंग माहिती कोणाशीही शेअर न करणे आणि संशयास्पद व्यवहार झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे.
डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असताना प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याने सतर्क राहणे ही काळाची गरज बनली आहे. कारण आता एकच बनावट SMS तुमच्या आयुष्यभराच्या बचतीवर डल्ला मारू शकतो.

