( बीड / वृत्तसंस्था )
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि पीकविम्याची रक्कम तातडीने देण्यासह पाच प्रमुख मागण्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर मांडल्या. विजयादशमीनिमित्त आज (२० ऑक्टोबर) रोजी नारायण गडावर आयोजित तिसऱ्या दसरा मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत जाहीर स्पष्टीकरण मागितले. भाजपमधील काही नेते आपल्याला श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये मिळाल्याची चर्चा करत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. या चर्चेतील सत्य स्पष्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्यात किंवा दुसऱ्या दिवशी उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
एकनाथ शिंदे यांनी भाजपमधील काही नेत्यांना आपल्याबाबत ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती दिली होती का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचे होते आणि ही रक्कम संबंधितांकडून घेऊन त्यांना दिली, असे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले होते का, याचे उत्तर मिळायला हवे, असे ते म्हणाले. भाजपचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या हातून आपल्याला ५०० कोटी रुपये पोहोचल्याची कुजबुज करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला ‘थर्ड पर्सन’ संबोधल्याची चर्चा असल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्याची मागणी केली.
आपल्याला ५०० कोटी रुपये दिले नसतील, तर ही चर्चा खोटी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगावे आणि पैसे दिले असतील, तर तेही जाहीर करावे, असे जरांगे म्हणाले. भाजप शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे की शिंदे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा छडा लावल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेत कोणाकोणाचा सहभाग होता, याचा पुरावा मागितला असल्याचे नमूद करत आपल्याकडेही पुरावा असून तो सर्वांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५०० कोटी रुपयांच्या चर्चेवर भाष्य करताना जरांगे यांनी आपण आजपर्यंत पाच हजार रुपयेही पाहिले नसल्याचे सांगितले. एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याची चर्चा कशी सुरू झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील लोकांच्या खिशातील पाकिटांमधून पैसे काढले, तरी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होईल, असा दावा त्यांनी केला. लोक आपल्यावर तीन ते चार हजार कोटी रुपयांची फुले टाकतात, असे सांगतानाच प्रत्येक मराठा कुटुंबाने १०० रुपये दिले, तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अडीच हजार कोटी रुपये जमा होतील, असेही जरांगे म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाचा उल्लेख करत जरांगे यांनी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज व्यक्त केली. आगामी दोन महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे सांगून पाण्याची गरज असलेल्या व्यक्तींना एकमेकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी या रकमेचा खर्चाशी संबंध जोडून हिशेब मांडला. पाच हजार रुपयांची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आठ दिवस हेलपाटे घालण्यात जातील, पेट्रोलवर २०० रुपये खर्च केल्यास एकूण दोन हजार रुपये जातील आणि जेवणासाठी ३२०० रुपये खर्च होतील, असे ते म्हणाले. शेतकरी संकटात असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत पुरेशी नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. आपण जीएसटी भरायचा आणि दुसरीकडे मोठमोठे बंगले उभे राहतात, असा उल्लेख करत समाजावर संकट आले असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, पीकविम्याचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, शेतकऱ्यांचे रखडलेले सर्व अनुदान द्यावे आणि गावोगावी चारा छावण्या उभाराव्यात, या मागण्यांचा त्यात समावेश आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.


