(नवी मुंबई)
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांना पनवेल सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज दोषी अधिकाऱ्यासह साथीदारांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. यामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
कुरुंदकर हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी होता. त्याने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत हे प्रकरण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. कुरुंदकर बरोबर सह आरोपी कुंदन भंडारी आणि फळणीकर या दोन आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबई पोलीसांनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांच्या तक्रारींवर काहीच दखल घेतली नव्हती. म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात ४ ऑक्टोबर २०१६ रोजी याचिका दाखल केली होती. यानंतर ३१ जानेवारी २०१७ ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत नोकरीवरून कुरुंदकर गायब झाला होता.
१६ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपती, आणि मुख्य न्यायमूर्ती भारत सरकार यांना निवेदन करून राजू गोरे आणि ९ वर्षाची मुलगी सिध्दी यांनी न्याय मिळत नसल्यामुळेच ईच्छा मरणाची परवानगी मागितली होती. याची दखल राष्ट्रपतींनी घेत २५ जानेवारी २०१८ ला चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. बिद्रे यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. मात्र कुरुंदकर यांचे पोलीस दलातील चांगले प्रस्थ लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरूंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरूंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली होती. फळणीकर याने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली होती.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले होते. पनवेल येथील सत्र न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी खटल्याचा निकाल दिला. पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या, शरीराचे वूडकटरने तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरविले होते; तर साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या घटनेतील तपासात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने कोर्टाने नवी मुंबई पोलीस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपेरे, सुरवसे, तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, सीपी हेमंत नगराळे यांच्यावर ठपका ठेवला.