(चिपळूण)
महापुराच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या गाळ उपशाला यंदा अपेक्षित गती मिळाली नसली, तरी प्रशासनाने आता हे काम वेगात पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपसा कामाचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. गोवळकोट येथील सुवेज कालवा, गणपती विसर्जन घाट, पेठ माप आणि शिवनदी परिसरातील गाळ उपशाची तपासणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश दिले.
२०२१ साली आलेल्या भीषण महापुरानंतर शहर व परिसरात गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले होते. गेली तीन वर्षे हे काम सुरू असले तरी, यंदा केवळ ६० हजार घनमीटर गाळच काढण्यात आला आहे. यंत्रसामग्रीच्या अभावामुळे कामाला गती मिळालेली नाही, हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी लिगाडे यांनी चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. शिवाय, गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणी स्वतः भेट देत कामाच्या धीम्या गतीची पाहणीही केली.
शिवनदीमधील गाळ उपशाचे काम ‘नाम काढला गाळ फाउंडेशन’मार्फत सुरू असून, सध्या फक्त पोकलेन मशीनच वापरली जात आहे. डोजर उपलब्ध नसल्याने गाळ पुढे सरकवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे डोजरची तातडीने उपलब्धता गरजेची असल्याचे बचाव समितीने स्पष्ट केले.
आता या कामाला गती देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालय वेळापत्रक तयार करणार असून, त्यानुसार चिपळूण बचाव समिती वेळोवेळी कामाची पाहणी करणार आहे. यंत्रणा आणि नियोजनाच्या समन्वयातून लवकरच गाळ उपशाचे काम अपेक्षित गतीने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनय साळुंखे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता विपुल खोत तसेच चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, बापू काणे, महेंद्र कासेकर आणि उदय ओतारी उपस्थित होते.

