(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरोधात चिपळूण आणि सावर्डे पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारांमुळे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
पहिल्या घटनेत, मुंबई–गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका परिसरात चितळे लंच होमसमोर आरोपी अजित काशीनाथ पवार (वय ४२, रा. अलोरे, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील टाटा मेंझा कार (MH-08-AN-4160) सार्वजनिक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी केली होती. संबंधित वाहनामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिस हवालदार अशोक कृष्णा शिंगाडे यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत, सावर्डे ते वहाळफाटा मार्गावरील पुलासमोरील सर्व्हिस रोडवर प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी गाडी (MH-04-BY-8465) निष्काळजीपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आल्याचे आढळून आले. आरोपी योगेश दिलीप जाधव (वय ३६, रा. दुर्गेवाडी-जाधववाडी, ता. चिपळूण) याच्याविरोधात सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी सतीश सिताराम कदम यांनी याबाबत फिर्याद दिली.
दोन्ही घटनांमध्ये सार्वजनिक रस्त्यावर वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित वाहनचालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

