(चिपळूण / रत्नागिरी)
चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील वन विभागाच्या सभागृहात पूरनियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून सर्व शासकीय यंत्रणांनी २४ तास सतर्क आणि सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रवीण लोकरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, “गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”
कशेडी भूस्खलनाचा भूवैज्ञानिक अभ्यास होणार
कशेडी घाटातील भूस्खलनाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, बोगद्याच्या आत कोणतीही दरड कोसळलेली नाही. मुसळधार पावसामुळे रस्त्यापासून सुमारे २०० मीटर उंचीवरील डोंगराचा भाग घसरून खाली आला आहे. या घटनेमुळे परिसरातील काही घरांनाही संभाव्य धोका निर्माण झाला असून संपूर्ण भागाचा भूवैज्ञानिकांकडून सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.
नदीतील गाळ उपशाचा परिणाम नागरिकांकडून जाणून घेणार
चिपळूणमधील वाशिष्ठी, खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वरमधील शास्त्री नदीतील गाळ उपशाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचा पूरनियंत्रणावर प्रत्यक्ष किती परिणाम झाला, याबाबत स्थानिक नागरिकांकडून अभिप्राय आणि अनुभव जाणून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी जनजागृतीत सक्रिय भूमिका घ्यावी
आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या-आपल्या भागात सक्रिय राहून नागरिकांमध्ये सतर्कता, सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
तसेच प्रांताधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन यंत्रणा सतर्क ठेवावी. कठडे नसलेल्या विहिरी पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण भरल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीच्या शेवटी डॉ. सामंत म्हणाले, “सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण जिल्हा आणि तालुका प्रशासन सज्ज आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम केल्यास कोणत्याही संकटावर प्रभावीपणे मात करता येईल.”

