(चिपळूण)
तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीमध्ये झाडाझुडपांत संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणात विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर, ता. चिपळूण) आणि जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर एजाज कुरेशी (रा. मालाड, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेजवळील दरीत काहीतरी जाळल्याचा संशय व्यक्त करत, त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे आढळल्याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता जळालेल्या अवशेषांसह हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग आणि इतर वस्तू आढळून आल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक पोलीस कर्मचारी आणि मोबाईल फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यासोबतच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.
जप्त हाडांच्या तुकड्यांबाबत कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला असता ती मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खून व पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने सुरू केला. चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान घटनास्थळाची जागा विशाल खोडदेकर याच्या मालकीची असल्याचे समोर आले. तो फरार असल्याने संशय अधिक बळावला. दरम्यान, मालाड पोलिसही त्याचा शोध घेत चिपळूण येथे दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक पडताळणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम राबवत दि. ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वाजता विशाल खोडदेकर याला अटक केली.
सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा खान हिचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिलाही दि. १ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ वाजता अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. ६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गुन्ह्यामागील नेमका हेतू, पार्श्वभूमी आणि अन्य धागेदोरे उलगडण्याचे काम सुरू आहे. पैशांच्या व्यवहारातून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मालाड येथे मयत एजाज यांचा असलेला फ्लॅट जन्नतुनिसा या महिलेने चार लाख रुपयांचे डिपॉझिट भरून भाडेतत्त्वावर घेतला होता. भाडे कराराची मुदत संपल्यानंतर एजाज यांनी फ्लॅट खाली करून मागितला. मात्र, जन्नतुनिसाने ना पैसे परत केले, ना फ्लॅट रिकामा केला.
घरमालक आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार तिने तिचा मित्र विशाल खोडदेकर याच्याकडे केली. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जन्नतुनिसा राहत असलेल्या खोलीत विशाल आणि एजाज यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत एजाज गंभीर जखमी झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर विशाल आणि जन्नतुनिसा यांनी मिळून एजाज यांचा मृतदेह बॅगेत भरून रामपूर येथे नेला. रामपूरमध्ये विशालची स्वतःची जागा असल्याने त्यांनी तेथेच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयास्पद जळालेल्या अवशेषांपासून सुरू झालेला तपास, वैज्ञानिक पुरावे आणि जलद कारवाईच्या जोरावर अल्पावधीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे त्यांच्या दक्षता, समन्वय आणि तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

