(खेड)
पुण्याहून खेडकडे येणाऱ्या एका कुटुंबाच्या वाहनाला कशेडी पवारवाडी येथे झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले असून एका महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता घडला.
प्रसाद प्रकाश खरे (वय ३४, रा. पुणे) हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना, त्यांच्या हुंडाई कारला (क्र. एम.एच. १४ एल.ई. ०२६१) कशेडी बोगद्याच्या पुढे, डायवर्ट केलेल्या मार्गावर समोरून येणाऱ्या मारुती डिजायर (क्र. एम.एच. २७ बी.झेड. १७१७) वाहनाने जोरदार धडक दिली. हे वाहन ज्ञानेश्वर भाउराव बालटकर (वय २४, रा. शेलु, जि. परभणी) चालवत होते. या अपघातात प्रिया प्रसाद खरे (वय २६), मणिषा प्रकाश खरे (वय ६१) व प्रकाश अनंत खरे (वय ६६) यांना किरकोळ जखमा झाल्या, तर प्रसाद खरे यांच्या आईला कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे.
संशयित चालकाने निष्काळजीपणे व अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.