(खेड)
तालुक्यातील किंजळे तर्फे नातू, पुरे, तडे, कुडीशी आणि सकिवली या पाच गावांना ओलिताखाली आणून परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न दाखविणारा ‘न्यू मांडवे लघु पाटबंधारे योजनेचा प्रकल्प तब्बल ४५ वर्षांपासून रखडलेला आहे. या प्रकल्पासोबत प्रस्तावित असलेला २ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प देखील आजतागायत केवळ कागदावरच मर्यादित राहिला आहे.
१९८३ साली या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. ४४५ मीटर उंचीचे धरण आणि २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता या प्रकल्पाच्या माध्यमातून १८७७ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. तथापि, दशकानुदशके उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास पोहोचलेला नाही. सांडव ९४ मीटर तर उजवा कालवा २१ किमी लांबीचा प्रस्तावित आहे. कालव्याच्या बहुतांश कामांचा मोठा टक्का पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी संपूर्ण प्रकल्पाचे काम ठप्प आहे. ११३.४० हेक्टर क्षेत्राचे भू-संपादन पूर्ण झाले असून त्यासाठी २९५.३४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त ८४ कुटुंबांचे पुनर्वसन मौजे तळे आणि मांडवे येथे करण्यात आले असून, देण्यात आलेल्या १८ नागरी सुविधांपैकी बहुतेक सुविधा पूर्ण झाल्या आहेत. तरीदेखील, धरणाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
या रखडलेल्या प्रकल्पामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी मागील चार वर्षांत अनेक आंदोलने, निवेदने आणि उपोषणे केली असून, प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे २६ जानेवारी रोजी धरणाच्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, अनेक बैठका आणि दिलेल्या आश्वासनांनंतरही कामाच्या गतीचा अभाव कायम आहे.

