(खेड)
मुंबई – गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या आराम बसला पाठीमागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी मुंबईहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या मोटारीने बसच्या पाठीमागे जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (वय ५०), जनार्दन खेराडे (वय ४०), परशुराम गुणाजी खेराडे (वय ६०, सर्व रा. संगमेश्वर) तसेच अर्जुन धोंडीबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी मदतकार्य सुरू केले. खेड पोलिसांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले.
सर्व जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या परशुराम खेराडे यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे मुंबई – गोवा महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, अपघातग्रस्त मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीतील सिलेंडरचा टँक पुढील सीटपर्यंत सरकल्याचे दिसून आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही. अन्यथा हा अपघात आणखी भीषण ठरला असता.

