(खेड / रत्नागिरी)
खेड तालुक्यातील उसरेवाडी येथील आयटीआय महाविद्यालयाजवळील मोरीजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागेश नाना उसरे (वय ४०, रा. भडगाव, उसरेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश उसरे हे २ ऑक्टोबर २०२६ रोजी उसरेवाडी येथील आयटीआय महाविद्यालयाजवळ असलेल्या मोरीजवळ बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी कळंबणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठविले.
डेरवण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे ११ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


