(रत्नागिरी / प्रतिनिधी)
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू धर्मातील स्पृश्य आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेल्या रत्नागिरीतील पतीत पावन मंदिरात वयोवृद्ध भजनीबुवांना भजन करण्यापासून रोखण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार भजनीबुवांनी पोलिसांत दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या स्वखर्चाने उभारलेल्या या ऐतिहासिक मंदिरात सर्व हिंदूंना समानतेने प्रवेश व पूजा करण्याचा हक्क दिला गेला होता. मात्र, २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गाडीतळ येथील पतीत पावन मंदिरात भजनासाठी आलेल्या भजनीबुवांना प्रदीप चंद्रकांत ऊर्फ बाबा परुळेकर यांनी “हे मंदिर आमचे आहे” असे सांगून प्रवेश नाकारला.
भजनीबुवांनी या आधीच, २५ मार्च रोजी मंदिर व्यवस्थापनाला पत्र देऊन शिवरात्री निमित्त भजनासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार २७ मार्च रोजी शांततेत भजन कार्यक्रमही पार पडला होता. परंतु, २६ एप्रिल रोजीच्या कार्यक्रमात सुरेंद्र यशवंत घुडे, संजय बुवा धाकू मेस्त्री, कौस्तुभ बुवा नागवेकर, सुदेश बुवा भरत नागवेकर, मनोज युवा भाटकर, जयवंत बुवा बोरकर या सर्व भजनीबुवांना साजेसे साहित्य घेऊन आले असताना प्रवेशावर बंदी घालण्यात आली.
या वागणुकीमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत व आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आहे, असा आरोप करत वयोवृद्ध भजनीबुवांनी स्थानिक पोलीस ठाण्यात प्रदीप परुळेकर यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. पतीत पावन मंदिराच्या ऐतिहासिक महत्वाला गालबोट लागणाऱ्या या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
असे काही ऐकलेही नव्हते.…
या प्रकारानंतर ८६ वर्षीय जयवंतबुवा बोरकर यांनी, “माझ्या ६३ वर्षांच्या भजन सेवेत मंदिरातून भजनीबुवांना बाहेर जाण्यास सांगितल्याची पहिलीच वेळ आहे. असे काही ऐकलेही नव्हते, ते आज अनुभवावे लागले,” अशा भावना व्यक्त करत दुःख व्यक्त केले.