(मुंबई)
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीअर परिसरात सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय असलेल्या कैसर हिंद इमारतीला रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ईडी कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. तथापि याबाबत ईडीने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन इंजिन, ६ जंबो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन,१ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि १०८ रुग्णवाहिका असा मोठा ताफा होता.
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ईडीचं कार्यालयही याच इमारतीत आहे. कैसर हिंद इमारतीचे भूमिगत 4 मजले, तळमजला आणि त्यावरील 4 मजले या ठिकाणी आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. कार्यालयातील लाकडी फर्निचर आणि इतर वस्तूंमुळे आग पसरल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या इमारतीमधील कार्यालयांचे तसेच ईडी कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याची माहिती समोर आली आहे.

