(चिपळूण / प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. २७ एप्रिल) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची पाहणी करणार आहेत.
सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार यांचे कसबा येथे आगमन होईल. स्मारक स्थळाची पाहणी केल्यानंतर ते सावर्डे येथे दाखल होतील. दुपारी १२.३० वाजता सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक होणार असून, त्यावेळी ते मार्गदर्शन करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या दौऱ्याची विशेष तयारी केली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.