(चिपळूण)
चिपळूण ही सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांची परंपरा लाभलेली भूमी असून अशा ठिकाणी विकृत मानसिकतेतून घडणाऱ्या कृत्यांना कोणतीही माफी देता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत चिपळूणमधील सुज्ञ व जागृत नागरिकांनी आज चिपळूण पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान मंदार कदम या व्यक्तीने केलेल्या कथित विकृत कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, त्याच्यावर कठोरात कठोर कायद्यांतर्गत निपक्षपाती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर घटना चिपळूणच्या सांस्कृतिक ओळखीला आणि सामाजिक मूल्यांना विरोधात असल्याचे नमूद करत, भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीला कडक शिक्षा होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्यायाविरोधात एकत्र येत सर्व उपस्थितांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली.
चिपळूण येथील भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर अल्पवयीन मुलीशी संबंधित कथित प्रकरणात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम (वय २७, रा. कापसाळ, ता. चिपळूण) असे संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या चिपळूण पोलिसांच्या ताब्यात आहे. तक्रारीनुसार, संशयिताने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच धमकी देत कथितरित्या जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे ती गर्भवती झाल्याचा आरोप आहे.
चिपळूणची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी, समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि अशा प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

