(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला असून, वालोपे येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण चिपळूण तालुका हादरून गेला आहे. भरधाव टँकरच्या बेदरकार धडकेत एका निष्पाप चिमुकलीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर आई मृत्यूशी झुंज देत आहे. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने वालोपे गाव शोकसागरात बुडालं आहे.
होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले कुणाल आग्रे हे पत्नी आणि चार वर्षांची मुलगी गार्गी हिच्यासह दुचाकीवरून घरी परतत होते. रात्रीच्या अंधारात वालोपे परिसरातील महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. चार वर्षांची निष्पाप गार्गी जागीच ठार झाली, तर गंभीर जखमी झालेल्या कुणाल आग्रे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीवर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाप-लेकीचे दृश्य पाहून घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांच्या काळजाचा थरकाप उडाला. काही क्षणांतच वालोपे गावात संतापाची लाट उसळली. “आता आणखी किती बळी जाणार?” असा संतप्त सवाल करत शेकडो ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. संतप्त नागरिकांनी महामार्ग पूर्णपणे रोखून धरल्याने दोन्ही बाजूंना तब्बल पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी तासन्तास महामार्गावर अडकून पडले होते. वारंवार होणारे अपघात, भरधाव वाहने, सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्पीडब्रेकर नाहीत, दुभाजक नाहीत, सुरक्षा उपाय नाहीत… आमच्या लेकरांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. गावकऱ्यांचा आक्रोश आणि संताप पाहता काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अपघातानंतर ग्रामस्थांनी पाठलाग करून टँकर चालकाला पकडले. संतप्त जमावाने त्याला चांगलाच “प्रसाद” दिल्याची चर्चा परिसरात होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अडीच तासांच्या समजुतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या भीषण अपघाताने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वारंवार अपघात होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
मुंबई-गोवा महामार्गावर दर काही दिवसांनी भीषण अपघात होतात, निष्पापांचे जीव जातात, कुटुंब उद्ध्वस्त होतात; मात्र प्रशासनाकडून केवळ पंचनामे आणि आश्वासनांची औपचारिकता सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महामार्गावर धोकादायक वळणे, अपुरे दिवे, दुभाजकांचा अभाव, स्पीडब्रेकर नसणे आणि भरधाव वाहनांवर नियंत्रण नसणे या गंभीर त्रुटींकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित विभाग आणि अधिकारी मात्र ढिम्म असल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक अपघातानंतर “चौकशी करू”, “उपाययोजना करू” अशी नेहमीची भाषा वापरली जाते; पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. महामार्गावरील निष्काळजीपणामुळे जर निष्पाप नागरिकांचे जीव जात असतील, तर केवळ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून प्रशासन जबाबदारी झटकणार का? वारंवार इशारे मिळूनही सुरक्षेच्या उपाययोजना न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल होणार का, असा संतप्त सवाल या अपघातानंतर उपस्थित होत आहे.

