(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील गणेशगुळे आणि गावखडी या समुद्रकिनाऱ्यांवर यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत सुमारे १५०० ते १६०० पिल्लांनी टप्प्याटप्प्याने समुद्राकडे यशस्वी झेप घेतली आहे.
गावखडी समुद्रकिनारी गेल्या अनेक वर्षांपासून कासव संवर्धन उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. यावर्षी गावखडी येथे एकूण १२९ घरटी मिळाली असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पिल्लांनी जन्म घेऊन समुद्रात प्रवेश केला आहे. त्यानंतर गणेशगुळे समुद्रकिनारी २१ घरटी संरक्षित करण्यात आली असून, या घरट्यांमधूनही टप्प्याटप्प्याने पिल्लांची सुटका करण्यात येत आहे.
या संवर्धन कार्यामध्ये कासव मित्र सचिन तोडणकर यांचे विशेष योगदान असून, त्यांनी सर्व घरटी काळजीपूर्वक संरक्षित करून पिल्लांचे योग्य व्यवस्थापन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कासवपिल्ले योग्य वेळी समुद्रात सोडण्यात येत आहेत.
सध्या १६ घरट्यांमधून सुमारे १५०० ते १६०० कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली असून, उर्वरित घरटीही पुढील १५ ते २० दिवसांत पूर्णपणे तयार होऊन त्यातूनही पिल्ले समुद्रात रवाना होतील, अशी माहिती मिळत आहे.

