( चिपळूण )
शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर येत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध घेत, संघटनात्मक बांधणीसह कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे स्पष्ट संकेत राऊत यांनी यावेळी दिले.
कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत राऊत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जोमाने आणि नियोजनपूर्वक कामाला लागावे. इच्छुकांनीही पक्षाचे काम अधिक गांभीर्याने घ्यावे.”
बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या आणि स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, जिल्हा उपसंघटक व माजी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, महिला संघटक वैशाली शिंदे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे संयोजन प्रशांत मुळे यांनी केले. राऊत यांच्या या दौऱ्यामुळे पक्षात नवचैतन्य संचारल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
एनडीआरएफ टीमला दिले पाठबळ
बैठकीनंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमची भेट घेतली. अधिकाऱ्यांशी संवाद साधत, आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला. चिपळूणच्या भौगोलिक रचनेबाबत त्यांनी काही सूचना देत, “राहण्याची व जेवणाची कोणतीही अडचण भासल्यास ती आपण सोडवू,” अशी आपुलकीची हमीही दिली.