(चिपळूण / मांडकी-पालवण)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद आणि मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ‘भारती ग्रीन टेक’चे संस्थापक श्री. विनय पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता कौशल्य विकासावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. “नोकरीमध्ये संधी ही पदवीवर नव्हे तर व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. त्यामुळे नोकरी मिळवण्याबरोबरच ती टिकवण्यासाठी मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने झाली. संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधींची दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या विनय पोळ यांनी कृषी क्षेत्रातील सध्याची स्थिती, बदलते रोजगाराचे स्वरूप तसेच आगामी काळातील संधी यावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी तसेच दोन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

