(नवी मुंबई)
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरू चीचकर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास गुरू चीचकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चीचकर यांची सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली आहे. ड्रग्स तस्करी प्रकरणी गुरू चीचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र या चौकशीच्या विवंचनेतून चीचकर यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुरू चिचकर यांनी आज सकाळी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता. अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?
मुलांच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने छळ केला जात होता, यातूनच आपण जीवन संपवतोय, असे गुरू चिचकर यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. एका प्रसिद्ध बिल्डरनं अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
गुरू चीचकर यांनी 9 एमएमच्या पिस्टलने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. पिस्टलचं लायसन्स त्यांच्याकडे नसल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. नेरुळ येथील NRI पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, अधिक माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.