(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली. भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. गीता पठण, गीतगायन व लोकमान्यांची आरती याप्रसंगी करण्यात आली.
लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत हभप महेशबुवा सरदेसाई उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, रत्नागिरीचे सुपुत्र लोकमान्य टिळक हे अष्टपैलू व राष्ट्रीय नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चळवळ उभी केली. त्यांच्या स्वराज्याचा मंत्र घेऊन आताच्या पिढीने प्रेरणा घेऊन सुराज्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
डॉ. साखळकर म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणत स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला. स्वदेशी चळवळ, स्वराज्य चळवळ, राष्ट्रीय शिक्षण चळवळ सुरू करून स्वातंत्र्याला पूरक वातावरण तयार केले. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पूरक कार्यक्रम राबवले. ते समाजकारणी, राजकारणी, संपादक, लेखक, गणिती तज्ज्ञ होते. गीतारहस्य ग्रंथ लिहिला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी गीतेतील अध्याय सादर केले. लोकमान्यांची आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, श्रीकांत भिडे, प्रशांत डिंगणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आदींसह प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.