( नवी दिल्ली )
‘डाबर च्यवनप्राश’विरोधात अवमानकारक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी पतंजली आयुर्वेदला दिले. डाबरच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी अंतरिम आदेश देत पतंजलीला जाहिरात मोहीम थांबवण्यास सांगितले आहे.
डाबरच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेत पतंजलीच्या ‘स्पेशल च्यवनप्राश’च्या जाहिरातींमध्ये त्यांच्या उत्पादनाचा आणि इतर सर्व च्यवनप्राश ब्रँडचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या जाहिरातीत “इतर कोणालाही आयुर्वेदाचे खरे ज्ञान नाही” किंवा “सर्वसामान्य च्यवनप्राश हे योग्य नाहीत” असे दावे करण्यात आले होते, जे केवळ तुलना नसून अपमानात्मक आहेत, असा दावा डाबरच्या वकिलांनी केला. जाहिरातीत वापरलेली ‘सामान्य च्यवनप्राश’ ही संज्ञा इतर सर्व उत्पादकांना कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करत असून, आयुर्वेदिक परंपरेचे ज्ञान फक्त पतंजलीकडेच आहे असा खोटा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे डाबरने म्हटले.
या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने हे आरोप लक्षात घेत अंतरिम मनाई आदेश देत पतंजलीला तातडीने संबंधित जाहिराती थांबवण्याचे आदेश दिले. या प्रकरणावर अंतिम सुनावणी येत्या काही आठवड्यांत होणार आहे.