(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने अवघ्या देशभरात नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. त्याच अनुषंगाने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयासमोर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी १४ एप्रिल रोजी सकाळपासून हजारो संविधानवादी, आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला होता.
सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा आणि पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या तुकडीने पुतळा परिसरात संचलन करून सलामी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असते. डीजे गजर, लेझिम, बेंजो, जय भीमचा नारा आणि शांतीचा संदेश देत रत्नागिरीतील निघालेल्या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी फटाक्यांची ही अतिषबाजी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक गावांमधून आलेल्या तान्हंनुल्यांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व अनुयायांच्या महामानवाला अभिवादनासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली बाजारपेठेतून पोलीस मुख्यालय मार्गे थिबा राजा प्रार्थनास्थळी समाप्त करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संपूर्ण देशाच्या परिवर्तनाचा धगधगता निखारा आज इतकी वर्ष झाली, तरी प्रत्येकाच्या हृदयाच्या सिंहासनावर ठाण मांडून आहे. महिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे ताठ मानेने वावरत आहे. असंख्य महिला उच्च पदावर काम करीत आहे. आपल्या भारत देशाला बलाढ्य लोकशाही असणारे “संविधान” बहाल केले. डॉ बाबासाहेबांनी लिहिलेला राज्यघटनेवर आज संपूर्ण देश चालत असून त्यांचाच वसा घेऊन हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या अनुयायांनी शांतीचा संदेश देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
रखरखत्या उन्हात पोलिसांचा बंदोबस्त
रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना रत्नागिरी पोलीस निरीक्षक शिवरकर आणि ट्रॅफिक पोलिस निरीक्षक थोरसकर यांच्या नियोजबध्द कामकाजातून आपले कर्तव्य बजावत होते. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी येथे येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना दर्शन घेणे सुखकर होण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांनीही पोलिसांना उत्तम सहकार्य केले.
यावेळी रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या कलिंगड कापा देऊन थंडगार करताना दिसून आले. महिला पदाधिकारी देखील सहभागी झाल्या होत्या. तसेच भीम युवा पँथर संघटनेचे अमोल जाधव, किशोर पवार, उमेश कदम, तुषार जाधव, नरेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी आंबेडकरी अनुयायांना कोकम सरबत वितरण करताना पाहायला मिळाले.
‘वंचीत’च्या स्वाक्षरी मोहिमेला उदंड प्रतिसाद
वंचीत बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरून उभारलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या प्रत्येक बांधवाने बोधगया बौद्धांच्या ताब्यात मिळावी या मागणीसाठी बोर्डावर स्वाक्षरी करून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवत स्वाक्षरी मोहिमेला उदंड प्रतिसाद दिला.