(रत्नागिरी / सिंधुदुर्ग)
रत्नागिरी परिमंडलात विजेचा वापर करूनही मासिक वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने तब्बल १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे एकूण २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा तसेच इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीमुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडलातील १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
महावितरणने थकबाकीदार ग्राहकांना देय दिनांकापूर्वी वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागेल, असे स्पष्ट आवाहन केले आहे.
वर्गवारीनिहाय थकबाकी
रत्नागिरी परिमंडलातील थकबाकीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
घरगुती १ लाख ४६ हजार २७७ ग्राहकांकडे १४ कोटी ५१ लाख रुपये, व्यावसायिक १४ हजार ४०० ग्राहकांकडे ५ कोटी २५ लाख रुपये, औद्योगिक १ हजार ६३९ ग्राहकांकडे ३ कोटी २८ लाख रुपये, सार्वजनिक सेवा ५ हजार १५० ग्राहकांकडे २ कोटी ६० लाख रुपये, तर इतर वर्गवारीतील ३५९ ग्राहकांकडे २७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
जिल्हानिहाय स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी विभागातील ४३ हजार ८४३ ग्राहकांकडे ५ कोटी ८४ लाख, चिपळूण विभागातील २४ हजार ६४८ ग्राहकांकडे ३ कोटी ३१ लाख आणि खेड विभागातील २६ हजार ३७५ ग्राहकांकडे ३ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७०८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली विभागातील ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ६ कोटी १२ लाख, तर कुडाळ विभागातील ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ७ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी असून, येथे ४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
थकीत वीजबिलांचा भरणा सुलभ व्हावा यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे मार्च २०२६ अखेरपर्यंत शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
ग्राहक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे कधीही, कुठूनही ऑनलाइन पद्धतीने वीजबिलांचा भरणा करू शकतात. डिजिटल माध्यमातून भरणा केल्यास देय रकमेवर ०.२५ टक्के सवलतही दिली जाते. तसेच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलांसाठी लघुदाब ग्राहकांना RTGS किंवा NEFT द्वारे भरण्याची सुविधाही उपलब्ध असून, त्यासाठीची माहिती वीजबिलावर नमूद करण्यात आलेली आहे.
थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे पुन्हा एकदा महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.

