(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर १ मध्ये उद्या बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत “आनंदाचा बाजार “या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समिती यांचे वतीने करण्यात आले आहे. मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण मालगुंड नंबर एक शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रम आणि भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विविध उपक्रम आणि कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आखले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याविषयी शाळा व्यवस्थापन समितीकडून अधिक माहिती देताना असे सांगण्यात आले की, शाळेतील आनंद बाजार म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान मिळावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि मनोरंजनासोबत काहीतरी नवीन शिकायला मिळावे यासाठी शाळेत भरवलेला एक छोटा बाजार असतो, जिथे विद्यार्थी स्वतः खाद्यपदार्थांचे किंवा इतर वस्तूंचे स्टॉल लावतात आणि विक्री करतात, ज्यामुळे त्यांना पैशांची देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार आणि ग्राहक सेवा यांसारखे कौशल्ये शिकायला मिळतात. हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवतात आणि त्यांना भविष्यात कणखर नागरिक बनण्यास मदत करतात.
या उपक्रमात माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समिती मालगुंड नंबर एक शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

