(जालना / प्रतिनिधी)
मूल्य संस्कारातूनच आदर्श पिढी घडेल आणि त्यातून सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असा विश्वास युवासंत गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केला तेव्हा हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून स्वामीनामाचा जयघोष केला.
अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाच्या सेवाकेंद्र सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ श्री. मोरे यांच्या उपस्थितीत जालन्यातील शिवनगर सेवाकेंद्रात झाला. यावेळी श्री मोरे यांनी विविध विषयांना स्पर्श करीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आजची पिढी थोडी भरकटली आहे. सोशल मीडियामध्ये गुंतलेली तरुणाई व्यसनाधीन बनली आहे. त्यातून बेरोजगारी आणि गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय आपल्या जन्मदात्या माता-पिताचा अनन्वित छळ करून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि आदर्श मुले घडण्यासाठी अगदी बाल वयातच मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. त्यातून सुसंस्कारित, निर्व्यसनी आणि सदाचारी पिढी घडेल आणि वृद्धाश्रमांची संख्याही घटेल. त्याकरिता सेवामार्गाचा मूल्य संस्कार विभाग सक्रिय आहे. सेवेकर्यांनी समाज परिवर्तनासाठी मूल्य संस्कार विभाग बळकट करावा असे आवाहन त्यांनी केले.
मूल्यसंस्कार व महिला सक्षमीकरण मेळावा
सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर दि.१ मे २०२५ रोजी मूल्यसंस्कार मेळावा तथा गुरु- मातृ- पितृ पाद्यपूजन सोहळा आणि बुलढाण्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे २० मे रोजी महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे विश्व कल्याणासाठी दि.२७ जून ते ४ जुलै २०२५ या काळात श्री क्षेत्र मथुरा येथे भागवत सप्ताह घेण्यात येणार आहे अशी सेवामार्गाच्या आगामी उपक्रमांची माहिती श्री. मोरे यांनी सेवेकऱ्यांना दिली.
मुलांनाही सेवाकेंद्रात न्या…
बरेचसे सेवेकरी मुलांना घरी ठेवून स्वतः सेवेसाठी केंद्रात जातात. अशा सेवेकर्यांनी कितीही सेवा केली तरी त्यांची मुले संस्कारक्षम होतीलच असे नाही. त्याकरिता सेवेकर्यांनी आपापल्या मुलांनाही सेवाकेंद्रात घेऊन येणे अत्यंत गरजेचे आहे याकडेही श्री. मोरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.