(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे आज (मंगळवार, 12 ऑगस्ट) रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला. संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांच्या हस्ते पूजा-अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर दर्शनासाठी प्रवेश दिला गेला. एकूण 18 तासांच्या कालावधीत, म्हणजे चंद्रोदयानंतर रात्री साडेदहा वाजेपर्यंत, हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.

श्रावण महिन्यात आलेल्या या विशेष योगामुळे घाटमाथा, कोकण तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंदिर व देवबाग परिसरात दर्शन रांगा उभारून त्यावर पत्र्याचे मंडप उभारण्यात आले होते. आरोग्य तक्रारींसाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात होते, ज्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

समुद्रकिनाऱ्यावर अपघात टाळण्यासाठी आणि भाविकांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणेने विशेष गस्त ठेवली होती. मंदिर परिसर आणि संपूर्ण गणपतीपुळे येथे गर्दी नियंत्रणासाठी जयगड पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस दल आणि अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वाहतूक व्यवस्थेसाठी सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल, खारभूमी मैदान (मालगुंड) तसेच इतर मोकळ्या जागांवर पार्किंगची सोय केली होती. जिल्हा वाहतूक कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवली. तसेच पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि इतर सोयीसुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि संबंधित यंत्रणांनी योग्य व्यवस्था केली.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने घाटमाथ्यावर विविध भागातील दुकानदारांनी पावसाळी ताडपत्री टाकून आपली दुकाने उभारली होती. दर्शनासोबतच भाविकांनी खरेदीचाही आनंद घेतला. मिरज येथील न्यू संगम ग्रुप आणि सांगली येथील नवप्रभात गणेशोत्सव मंडळाने यात्रेत खिचडी प्रसादाचे वाटप केले.

सायंकाळी साडेचार वाजता गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच सदस्य, पुजारी, कर्मचारी, पोलीस, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या संपूर्ण यात्रोत्सवाचे सुरळीत आयोजन आणि शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा, अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्ट आणि इतर सर्व यंत्रणांनी विशेष मेहनत घेतली.

