(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावी श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभावळकर कुटुंबियांच्या श्रीराम देवस्थान मंडळाने बांधलेल्या या मंदिरात मागील जवळपास १५० वर्षांपासून पासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी संपूर्ण मंदिर व रामाचा पाळणा फुलांनी सजवला होता. सकाळी प्रभू श्रीरामाना जल व दुग्ध अभिषेक करण्यात आला. त्यानंतर साधारण अकरा वाजता राम जन्माच्या कीर्तनाला सुरुवात झाली. रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ. अनुया बाम यांचे सुश्राव्य कीर्तन यावेळी आयोजित करण्यात आले होते. दुपारी बाराच्या सुमारास श्रीरामाच्या मूर्तीवर गुलाल उधळून व पुष्पवृष्टी करून रामनामाच्या जयघोषात रामजन्म संपन्न झाला.
महिला भाविकांनी आरती ओवाळून पाळणा म्हटला. महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहोळ्याला भाविकांनी गर्दी केली होती. तसेच मंडळाचे विश्वस्त व पुरोहित उपस्थित होते.