(पाली / वार्ताहर )
निपुण महाराष्ट्र कृती आराखड्या मध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीतील शंभर टक्के विद्यार्थी संख्या,निपुण भारत अध्ययन स्तर, वाचन,लेखन,संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया व प्रत्येक इयत्तांच्या अध्ययन स्तरानुसार विद्यार्थी प्रगत होतील यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर यांनी मार्गदर्शन करताना केले.
साठरे नं.२ येथे पाली केंद्राची शिक्षण परिषद हातखंबा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. सोपनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व केंद्रप्रमुख विष्णू पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी निपुण महाराष्ट्र कृती आराखडा, चावडी वाचन,मार्गदर्शन ,शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच पाली केंद्रातील नवोदय परीक्षेतील यशाबद्दल पाली नं. १ शाळेचे शिक्षक मारुती घोरपडे, साठरे नं.२ शाळेची विद्यार्थिनी आकांक्षा मुरलीधर यादव हिने रत्नागिरी प्रज्ञा शोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा व मार्गदर्शक शिक्षिका स्मिता परुळेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच साठरे नं.२ शाळेतील कार्तिकी सदानंद सागवेकर इयत्ता सातवी व शिक्षक दिगंबर तेंडुलकर यांची नासा संस्था (अमेरिका) भेटीसाठी निवड झाल्याने त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पाली केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील गुणवत्ता विकासातील मार्गदर्शक डॉ. सोपनूर व केंद्रप्रमुख विष्णू पवार यांना गौरविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अस्मि शिंदे, राहुल मिसाळ व पाली केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका संपदा रसाळ, अस्मिता परुळेकर, स्नेहल तेंडुलकर, शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक दिगंबर तेंडुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.