(नवी दिल्ली)
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. फेब्रुवारीत होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’च्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील निवासस्थानी एआय क्षेत्रातील प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते. या सत्राचा उद्देश धोरणात्मक सहकार्य वाढवणे, एआय नवोपक्रम सादर करणे आणि भारताच्या एआय मिशनला गती देणे हा होता.
डेटा सुरक्षा आणि पारदर्शकतेवर भर
पंतप्रधान मोदी यांनी डेटा सुरक्षा, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि जबाबदार नवोपक्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरक्षित एआय परिसंस्था उभारण्याची गरज असल्याचे सांगत, भारताच्या एआय प्रवासात देशाची मूल्ये आणि चारित्र्य प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
आत्मनिर्भरतेला उद्योगविश्वाचा पाठिंबा
संवादादरम्यान उपस्थित सीईओंनी एआयमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या ध्येयाला पाठिंबा दर्शवला. भारताला जागतिक पातळीवर एआयमध्ये आघाडीवर नेण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे आणि संसाधनांच्या योग्य वापराचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी सर्व क्षेत्रांत नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि त्याचा राष्ट्रीय विकासासाठी प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली. प्रमुख क्षेत्रांत स्वदेशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
UPIप्रमाणे एआयमध्येही यश शक्य
आगामी ‘एआय इम्पॅक्ट समिट’चा उपयोग नव्या संधी शोधण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी करावा, असे आवाहन करत पंतप्रधानांनी सांगितले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)मुळे भारताने आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली आहे. अशीच पुनरावृत्ती एआय क्षेत्रातही शक्य आहे.
‘सर्वांसाठी एआय’चा दृष्टिकोन
भारताकडे प्रमाण, विविधता आणि लोकशाही यांचा अद्वितीय संगम असल्यामुळे जगाचा भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर विश्वास आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी ‘सर्वांसाठी एआय’ या दृष्टिकोनाची पुनरुक्ती केली. भारताला जागतिक एआयचे अग्रणी केंद्र बनवण्यासाठी सीईओ आणि तज्ञांनी एकत्र काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.
या संवादात विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, झोहो कॉर्पोरेशन, एलटीआय माइंडट्री, जिओ प्लॅटफॉर्म्स, अदानीकनेक्स, नेक्स्ट्रा डेटा आणि नेटवेब टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांचे सीईओ सहभागी झाले. तसेच आयआयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बे येथील तज्ञ उपस्थित होते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.

