(रत्नागिरी)
शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला विविध अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कचरा टाकताना पकडल्यावर काही जण कर्मचाऱ्यांवर धावून येत आहेत, तर काहीजण टाकलेला कचरा पुन्हा उचलून नेत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत.
आरोग्य विभागाचे निरीक्षक संदेश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गस्त घालून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, पथकाची गस्त संपताच पहाटे काही नागरिक पुन्हा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अशा पाच जणांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरात सकाळ, दुपार आणि रात्रीच्या वेळेस कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या फिरतात. तरीदेखील अनेक नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यांवर कचरा टाकत असल्याने शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दोन विशेष पथके नेमली आहेत. आरोग्य निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही पथके रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत गस्त घालत आहेत.
नुकतीच सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान मिरकरवाडा, झारणी रोड, उद्यमनगर या भागांमध्ये कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र अविघटनशील घनकचरा नियंत्रण नियम २००६ आणि उपविधी २०१७ अन्वये ही दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

