(मुंबई)
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक अपडेट आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता ८ मार्च रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र आता एप्रिलच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केली जाईल. या महिन्याच्या शेवटी, लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. मार्च महिन्यात हप्ता न आलेल्या महिलांना या एप्रिलच्या हप्त्यातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
अक्षय तृतीयेच्या विशेष दिवशी सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती मिळाली आहे. तथापि, यंदा लाभार्थ्यांची संख्या कमी होईल की वाढणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती. यंदा किती महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार हे महत्त्वाचे ठरले आहे.
जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे, त्यासाठी राज्य सरकारने निकषही निश्चित केले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी समोर आल्याने आता पडताळणीची गरज भासली आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो, ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. एकूण ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे १३,५०० रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आणि मार्च) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल महिन्यात या योजनेचा १०वा हप्ता मिळणार आहे.