(नवी मुंबई)
नवी मुंबईतील तळोजा परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका इलेक्ट्रिक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या दुकानात घुसली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर-१० परिसरातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. वाहनाचा वेग प्रचंड असल्याने अनेक जण हवेत फेकले गेले. त्यानंतर कार थेट रस्त्यालगतच्या दुकानात घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे नाव नदीम खान असे असून इतर दोघांची ओळख अद्याप झालेली नाही. नदीम खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जखमींमध्ये काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, वाहन अतिवेगात होते का, तसेच चालक मद्य किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली होता का, याचा तपास सुरू आहे. यासाठी चालकाची वैद्यकीय तपासणी आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे तळोजा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. या प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत.

