(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली आहे. पोलीसांकडून धडक कारवाई सुरू असल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांचा ब्राऊन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस यंत्रणेने अंमली पदार्थांच्या विरोधात धडक मोहीम सुरू करताच अवैध धांदेवाईक धास्तावले आहेत. एलसीबी विभागाचे पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना नाचणे ते गुरुमळी मार्गावर एका दुचाकीस्वाराच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना दिसून आल्या. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत अंमली पदार्थ असण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी दोन पंचांना बोलावून त्याची तपासणी केली. या तपासणीत त्याच्या ताब्यातील पिशवीत ब्राऊन हेरॉईन सदृश्य १५४ पुड्या आढळून आल्या. या पदार्थांचे वजन १० ग्रॅम असून त्याची किंमत दोन लाख पाच हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ आरोपी अदनान नाजीममियाँ नाखवा (वय २५, रा. जुना फणसोफ, ता. जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला माल रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई पथकात एपीआय वाघ, पोहेकॉ झोरे, पोहेकॉ पालकर , पोहेकॉ सावंत आणि पोहेकॉ डोमणे यांचा समावेश होता.