(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोणतीही पूर्व सूचना न देता घर खाली करण्यास सांगून भाडेकरुशी झालेल्या झटापटीत भाडेकरुवर चाकूचे वार केल्याची घटना कसबा (ता. संगमेश्वर) येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अदनान नुरमोहंमद हकीम (४३, मूळ रा. उजगाव, करवीर, कोल्हापूर, सध्या रा. कसबा, संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. ते कसबा येथील एका महिलेच्या घरी भाड्याने राहतात.अदनान हकीम हे कसबा येथील घरी आले असता दोन महिलांनी त्यांच्या घरी जाऊन ताबडतोब घर खाली करण्यास सांगितले. त्यावर हकीम यांनी ‘मला दुसरे घर मिळाल्याशिवाय मी घर खाली करू शकत नाही,’ असे सांगितले.
हकीम हे भाड्याच्या राहत्या घरात गेले असता या दोन महिलांनी त्यांना पुन्हा बोलावून घेत उद्याच.घर खाली करण्यास सांगितले. यावेळी युसुफ कापडी (३२) याने हकीम यांना धरून ठेवले. त्याचवेळी रौउफ बोट (३६, रा. कळंबस्ते, संगमेश्वर) याने चाकू घेऊन झटापट केली. या झटापटीत हकीम यांच्या हाताला चाकूमुळे दुखापत झाली.