(साखरपा / भरत माने)
महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. यामुळे गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांनी कोंडगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडी मध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी व जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले.
याविषयीं माहिती देताना सांगितले की, हा आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापढे हे खपवून घेतलं जाणार नाही.
दर महिन्याला हे पोषक खाद्य एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून या धान्याचे वितरण अंगणवाडीमधून केले जाते. साधारण सरासरी महिन्याला 20-25 महिलांना हे खाद्य दिले जाते. हे निकृष्ट खाद्य खाल्ले तर याची लागण लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते, याला कोण जबादार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवर शासन स्तरावरून कोणती कार्यवाही होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.