(देवरूख)
कोकणातील पारंपरिक लोककलेपैकी एक असलेल्या झांजगी नमन लोकनाट्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन १५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे सादर होणार असून, हा क्षण कोकणच्या लोककला इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अवघ्या सहा वर्षांत झांजगी नमनाला नव्या उंचीवर नेण्याचे कार्य गोळवली येथील युवक निलेश किंजळकर यांनी केले आहे. परंपरेला आधुनिक सादरीकरणाची जोड देत त्यांनी नमनाला नवसंजीवनी दिली. या उपक्रमामागे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची संकल्पना आणि पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
या ऐतिहासिक परदेशवारीला महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे नमनातील राजा, प्रधान आणि प्रजेसह संपूर्ण कलावंतांची टीम परदेशात कोकणची लोकसंस्कृती सादर करणार आहे.
दुबईतील ग्लेन्डेल इंटरनॅशनल स्कूल येथे १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा विशेष नमन प्रयोग रंगणार आहे. यासाठी २० कलाकार दुबईला रवाना होणार असून, १४ फेब्रुवारीला त्यांचा प्रवास निश्चित आहे. परदेशवारीपूर्वी दादर येथील शिवाजी नाट्यमंदिरात एक विशेष प्रयोगही होणार आहे.
या यशात जिल्ह्यातील कलाप्रेमी दानशूर व्यक्तींचा खारीचा वाटा लाभला आहे. स्वर्गीय अनंत पाले आणि स्वर्गीय शंकर भुवड हे या युवक कलाकारांचे प्रेरणास्थान असून, शाहिर एकनाथ डिके, केतन किंजळकर, बबन धनावडे, अनिल किंजळकर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शिवभक्त कोकण लोकनाट्य नमनचे हे सहावे वर्ष असून, नमनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. जुन्या पिढीतील नमन कलाकारांचे अनुभव, त्यांचे आशीर्वाद आणि नव्या पिढीचा उत्साह यामुळे झांजगी नमन आज पुन्हा जोमात आले आहे.
जिल्ह्यातील विविध नमन मंडळांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केल्यानंतर कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राजा, प्रधान आणि प्रजेसह दुबईत सादर होणारे हे नमन कोकणच्या लोककलेचा ठसा जागतिक पातळीवर उमटवणार आहे.

