(संगमेश्वर / प्रतिनिधी)
येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागाने तयार केलेल्या २६ व्या ” कलासाधना ” या चित्रकला वार्षिकचे प्रकाशन नुकतेच संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये समाविष्ट विद्यार्थ्यांच्या कलाकृती म्हणजे भावी चित्रकारच असल्याचे गौरवोद्गार संस्थाध्यक्ष शेट्ये यांनी काढले.यावर्षीच्या कलासाधनाचे वैशिष्ट्य म्हणजे भिरकोन्ड येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने केवळ ब्लेडच्या सहाय्याने साकारलेलं मुखपृष्ठ होय.
सन २००० साली पैसा फंड मधील कलेची आवड असणा-या विद्यार्थ्याना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतुने प्रशालेतील कला विभागा तर्फे कलासाधना हे वार्षिक तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.याचा आणखी एक उद्देश असा होता की , प्रशालेकडे विद्यार्थ्यांच्या कलाक्रुतींचा संग्रह करण्या बरोबरच हे विद्यार्थी भविष्यात नामवंत कलाकार बनले, तर त्यांची बाल कला शाळेकडे संग्रहीत असेल.कलासाधनाच्या माध्यमातुन प्रशालेकडे आजवर १६०० पेक्षा अधिक चित्रांचा संग्रह झाला आहे.
पैसा फंडच्या कला विभागा मार्फत ज्या शाळांमधुन कला शिक्षक नाहीत अशा शाळांमधील मुलांना रेखाकला परीक्षेच्या द्रुष्टीने मोफत मार्गदर्शन करण्यात येते.याबरोबरच कलेची आवड असणा-या गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे कला साहित्य मोफत पुरविले जाते.या उपक्रमाचा लाभ घेवुन गत २६ वर्षात जवळपास २५० पेक्षा अधिक विद्यार्थी कला क्षेत्रात स्वताच्या पायावर उभे राहण्यात यशस्वी झाले आहेत.
कलासाधना मध्ये गत २६ वर्षात लावण्यात आलेली विविध प्रकारची आणि शैलीतील चित्रे पाहुन शाळेतील अन्य मुलांनाही प्रोत्साहन मिळत आहे.या वर्षीच्या कलासाधनाचे मुखप्रुष्ठ रिद्धी प्रदीप गुरव हिने साकारले आहे.पैसा फंडच्या कलासाधना आणि कलावर्ग उपक्रमाचे आजवर माध्यमिक शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, कलासंचालक, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कला महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यवर कलाकार, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, कलाशिक्षक, उद्योजक, पुस्तक प्रकाशक अशा असंख्य मंडळींनी प्रत्यक्ष भेट देवुन कौतुक केले आहे. उपक्रमाची प्रत्यक्ष पहाणी करुन समाधान व्यक्त करताना असे प्रयोग अन्यत्र होणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
कलावर्ग उपक्रमात विद्यार्थ्यांना कला विषयाच्या पुस्तकांचे ग्रंथालय , चित्र रेखाटण्यासाठी आधुनिक बैठक व्यवस्थ्या, चित्रफलक, प्रात्यक्षिकासाठी स्वतंत्र खोली, डिजिटल कलाशिक्षण, नामवंत चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे दर्शन यासह विविध साहित्यांचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जातो.या विविध प्रयोगामुळे येथील विद्यार्थी कला महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला प्राथमिक अभ्यासक्रम शालेयस्तरावर शिकत असुन आवड जोपासली गेल्याने दहावी, बारावी नंतर कलामहाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आहे.
यावर्षीच्या कलासाधना मध्ये साठ पेक्षा अधिक कलाकृती असुन यात कलेतील सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशालेतील अन्य विद्यार्थ्याना कलासाधना मधील कलाकृती पाहुन प्रोत्साहन मिळत असल्याने हा उपक्रम म्हणजे शाळेसाठी एक अभिमानास्पद बाब असल्याचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले.आमच्या प्रशालेतील विद्यार्थी कला स्पर्धा, परीक्षांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात हा कलावर्ग उभारणीचाच लाभ असल्याचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिमानाने सांगितले.
फोटो :
१) कला साधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करताना संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सहसचिव अनिल शिंदे, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे आणि मान्यवर.
२) बालकलाकार रिद्धी गुरव हिने साकारलेले कलासाधनाचे मुखपृष्ठ
(छाया : मीनार झगडे)

