(संगमेश्वर / संदेश जिमन)
स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत चाललेल्या काळात संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा मजबूत करणारी ठरली आहे.
अंत्रवली मालपवाडी येथील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात रोख रक्कमेसह वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच साहजिकच चिंता आणि अस्वस्थता वाढली.
दरम्यान, हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले. कोणताही लोभ न धरता आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी प्रामाणिकपणे पाकिटातील कागदपत्रांच्या आधारे नितेश मालप यांचा शोध घेतला आणि ते पाकीट त्यांना सुरक्षितपणे परत केले.
आज अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशाच मावळते. अशा वेळी सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजासमोर प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सकारात्मक आदर्श उभा राहिला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, ती अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.

