(देवरुख)
विधवा व एकल महिलांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या चक्रभेदी संस्थेच्या वतीने यंदाही विधवा महिलांचे हळदीकुंकू आणि उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचायत समिती देवरुख येथे पार पडलेला हा उपक्रम पाचव्या वर्षात पदार्पण करत असून खेड, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण येथून सुमारे दीडशे महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित महिलांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा प्रोजेक्टरवर फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या वेळी विधवा व एकल महिलांना हळदीकुंकू, वाण, गुलाबाची फुले, पान-सुपारी आणि तिळाचे लाडू देत मान-सन्मान करण्यात आला. वैदेही सावंत यांनी मार्गदर्शन करताना नवरा वारल्यानंतर बांगड्या फोडणे, जोडवी काढणे, कुंकू पुसणे अशा अनिष्ट प्रथा बंद करण्याची गरज व्यक्त केली. केशवपन आणि सतीप्रथा नष्ट झाल्या असल्या तरी त्यांचे अवशेष आजही समाजात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात, ते संपवले पाहिजेत असे त्यांनी ठामपणे सांगितले. विधवा महिलांनी स्वतः सक्षम होण्यावर भर द्यावा, कोणाचेही नुकसान न करता स्वतःचा निर्णय घ्यावा आणि सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक यापासून सावध राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना इंटरनॅशनल संस्थेकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल चक्रभेदी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
लांजाच्या अमृता तांडेल यांनी “माझं कुंकू माझ्या आईने लावलं आहे, त्यामुळे ते पुसायचा अधिकार कोणालाही नाही,” असे मत मांडत उपस्थितांची दाद मिळवली. बी द चेंज फाउंडेशनकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ मिळाल्याबद्दल प्राची राव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विधवा महिलांचे प्रश्न मांडणारी प्रभावी कविता सादर केली.
संगमेश्वरच्या प्रणिता घोलपे यांनी चक्रभेदी संस्थेमुळे समाजात मान-सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली. खेडच्या दिक्षा माने यांनी अशा सन्मान समारंभांचे आयोजन सर्वत्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब चौगुले, प्रणिता घोलपे, दिक्षा माने, वैदेही किरवे, श्रद्धा प्रसादे, कविता काजरेकर, आरती बने, मनीषा बामणे, दिपाली गावडे आणि शबाना खतीब यांनी विशेष परिश्रम घेतले. सभागृह वेळेवर उपलब्ध करून दिल्याबद्दल गटविकास अधिकारी आनंद लोकरे व सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांचे आभार मानण्यात आले. पंचायत समिती देवरुखचे महेश सावंत व कदम सर यांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी खेडच्या सुनंदा विजय मोरे यांनी सुमधुर गीत गायन सादर केले. अल्पोपहार व चहापानानंतर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

