(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व देवरुख विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रवींद्र सखाराम जागुष्टे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
गावी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईला नोकरीसाठी जागुष्टे गेले. या ठिकाणी क्रॉम्प्टन अँड गेव्हस या कंपनीत सेवा वाहिली. सेवेतुन निवृत्त झाल्यानंतर गावी येऊन सामाजिक कार्य सुरू केले. गोरगरिबांच्या व्यथा जाणून शासकीय पातळीवरील त्यांची कामे करून देण्याचे कार्य हाती घेतले. यातूनच गावच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येता आले. त्यांच्या कामाची दखल घेत सदस्यांमधून थेट सरपंच पद बहाल करण्यात आले.
सरपंच कालावधीमध्ये ओझरे खुर्द गावात चांगली विकास कामे करून आदर्श सरपंच म्हणून ख्याती जागुष्टे यांनी मिळवली होती. या गावांमध्ये अनेक विकासाची कामे त्यांनी मार्गी लावली. सरपंच पदावरून उतरल्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक काम सुरूच ठेवले होते.
या त्यांच्या कामातूनच देवरुख विविध कार्यकारी सोसायटीमध्ये देखील संचालक म्हणून निवडून आले. या पदावर गेली तीन वर्षे जागुष्टे कामकाज करत होते. विविध संघटनांमध्ये देखील ते सदस्य म्हणून काम करत असत. स्वतःचा किराणा मालाचा व्यवसाय देखील विघ्रवली या गावी त्यांनी चालवला.
रवींद्र जागुष्टे यांचे वृद्धापकाळमुळे चिपळूण येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव गावी आणून सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई व 2 नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

