(नवी दिल्ली)
ईपीएफओ 3.0 अंतर्गत करण्यात आलेल्या डिजिटल सुधारणांमुळे भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे. आवश्यक कागदपत्रे योग्य असतील आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल, तर पीएफची रक्कम आता काही तासांत किंवा कमाल 8 दिवसांत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे पीएफधारकांचा अनेक दिवसांचा प्रतीक्षा काळ संपुष्टात आला आहे.
पूर्वी पीएफ क्लेमसाठी फाईल प्रक्रिया, कंपनीची मंजुरी, प्रोफाईलमधील त्रुटी आणि अपूर्ण कागदपत्रे यांमुळे मोठा विलंब होत होता. मात्र नव्या EPFO 3.0 प्रणालीमुळे या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 23 जानेवारी 2026 पर्यंत 8.53 कोटींहून अधिक पीएफ क्लेम्सचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या लक्षणीय वाढ दर्शवते.
फेस ऑथेंटिकेशनमुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद
ईपीएफओने फेस ऑथेंटिकेशन प्रणाली लागू करून सुरक्षेसोबतच वेगावर भर दिला आहे. ऑगस्ट 2025 पासून नव्या कर्मचाऱ्यांसाठी यूएएन तयार करताना फेस ऑथेंटिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. उमंग अॅपद्वारे आधार आधारित फेस व्हेरिफिकेशन करून कर्मचारी स्वतःच यूएएन तयार व ॲक्टिव्हेट करू शकतात. त्यामुळे एजंट किंवा कार्यालयांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार
EPFO 3.0 अंतर्गत सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टम लागू करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनधारकांना आता एका विशिष्ट बँकेत खाते ठेवण्याची अट राहिलेली नाही. देशातील कोणत्याही शेड्युल्ड बँकेतून पेन्शन घेता येणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पीएफ ट्रान्स्फरसाठी कंपनीच्या मंजुरीची गरज नाही
ई-केवायसी पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली विशेष फायदेशीर ठरणार आहे. नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्स्फरसाठी आता जुन्या किंवा नव्या कंपनीची मंजुरी आवश्यक नाही. कर्मचारी थेट ऑनलाइन क्लेम फाईल करू शकतात. यामुळे जुन्या कंपनीशी संपर्क न होणाऱ्या किंवा कागदपत्रांमध्ये अडचणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
एकूणच, EPFO 3.0 मुळे पीएफ क्लेम, ट्रान्स्फर आणि पेन्शन प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कर्मचारी-केंद्रित बनली आहे. डिजिटल सुधारणांमुळे पीएफधारकांचा वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

