(रत्नागिरी)
भारतासारखा देश जगाच्या पाठीवर एकमात्र असा देश ज्या देशाकडे स्वतःचे अतुलनीय असे ज्ञान आहे. प्रत्येक क्षेत्रात प्राचीन भारतात भरीव संशोधन झाले . यातीलच भारतीय गणित व त्याचा इतिहास हा वैभवशाली असून प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे अधिष्ठाता डॉ कृष्णकुमार पांडेय यांनी काढले. ते केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने,कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, संस्कृत विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित त्रि दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी आभासी पद्धतीने संवाद साधत होते.
डॉ कृष्णकुमार पांडेय यांनी भारतीय गणिताचा इतिहास आणि व्याप्ती या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ कृष्णकुमार पांडेय म्हणाले की, वेदांमध्ये आधीपासून गणिताचा संबंध दिसून येतो. शिवाय संख्यांचा उल्लेख आढळतो. यावेळी त्यांनी पायथागोरस प्रमेय, पाय संकल्पना, विविध प्राचीन ग्रंथात असलेली गणितीय सूत्रांबाबत माहिती दिली. पुढे ते म्हणाले की , विविध कालखंडात गणिताचा उत्कर्ष होत गेला. वैदिक काळ, शुल्ब काळ, वेदांग ज्योतिष काळ, सूर्यप्रज्ञप्ति काळ, शैशव काळ अथवा अंधकार युग, मध्य काळ/ स्वर्ण युग, उत्तर काळ, वर्तमान काळ या काळांमधील शैशव काळात दाशमिक अंकलेखन पद्धत, शून्य व बीजगणिताचा प्रयोग, अंकगणिताचा विकास व सूर्यसिद्धात रचना हे आविष्कार झाले. असे ते म्हणाले
यावेळी या व्याख्यानाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. राजीव सप्रे, संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ कल्पना आठल्ये, प्रा स्नेहा शिवलकर, प्रा प्रज्ञा भट तसेच रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, अन्वेष देवुलपल्लि, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यशाळेतील विद्यार्थी, स्थानिक नागरिक, गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते.