(रत्नागिरी)
महसूल विभागातील स्थानिक बदल्यांची प्रक्रिया यंदा नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत महिनाभर उशिराने सुरू झाल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी आवश्यक वेळ न दिल्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या प्रक्रियेबाबत प्रचंड असमाधान असून, बदल्यांचे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे संकेत मिळत आहेत.
प्रत्येकवर्षी एप्रिलमध्ये सुरू होणारी बदल्यांची प्रक्रिया यंदा थेट २६ मे रोजी हाती घेण्यात आली. त्यातही बदलीपात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपंगत्व, वैद्यकीय गरजा वा इतर कारणांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी २४ तासांचाही अवधी न दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली आहे.
याशिवाय, गेली १३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेले काही विशिष्ट कर्मचारी बदलीपात्र यादीतून वगळल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. यामुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या संघटनाही यावर काहीही भाष्य करत नसल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
“अचानक व अल्पकालीन सूचना देऊन प्रक्रिया पूर्ण करणं ही नियोजनशून्यतेची लक्षणं आहेत,” असं अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे महसूल खात्यातील या बदल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पुढील काही दिवसांत ही बाब अधिक गाजण्याची शक्यता आहे.